AgriStack Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारने यात शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. या नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी २६ कोटी रुपयांच्या स्वतंत्र निधी मंजुर केला आहे. मंजूर करण्यात आलेला हा निधी२०२५-२६ या आर्थिक वर्षात विशेषतः अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. याद्वारे डिजिटल पिकनोंद, विविध अनुदाने आणि विमा संबंधित लाभ थेट मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजनेत डिजिटल क्रॉप सर्व्हे ही सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शेतातील पिकांच्या माहितीचे डिजिटलीकरण झाल्याने पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना थेट शासकीय योजनांचे लाभ त्वरित मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकार ६० टक्के तर राज्य सरकार ४० टक्के निधी उपलब्ध करून देत आहे. आगामी २०२५-२६ या वर्षासाठी केंद्र सरकारने एकूण २६ कोटींपैकी आपला हिस्सा मंजूर केला आहे. आता उर्वरित निधी राज्य सरकारकडून उपलब्ध होईल.
योजनेचे फायदे.. (AgriStack Yojana)
डिजिटल क्रॉप सर्व्हेमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होईल. याबरोबरच तसेच पिकांची नोंद अचूक आणि तातडीने होण्यास मदत होईल. योजनांचे अनुदान आणि विमा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास मदत. शेतकऱ्यांना कर्जप्रक्रिया आणि पिकविमा जलद होईल. बाजारभाव, हवामान, खत-बियाणे यांची उपलब्धता याची माहिती त्वरित मिळेल. एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तसेच तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.