वॉशिंग्टन: जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे अमेरिकन ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र असंतोषानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वाचा यू-टर्न घेतला आहे. त्यांनी कॉफी, टोमॅटो, केळी आणि गोमांस यांसह २०० हून अधिक खाद्यपदार्थांना विविध प्रकारच्या करांमधून सूट देणारा कार्यकारी आदेश जारी केला आहे.
ग्राहकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे, विशेषतः गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानंतर अध्यक्षांनी सामान्य लोकांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहेत.
भारताच्या निर्यातीला मोठा फायदा

अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातून होणाऱ्या आंबा, डाळिंब आणि चहा यांसारख्या मालाच्या निर्यातीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवरील कर देखील काढून टाकले होते. भारताकडून अमेरिकेला जेनेरिक औषधांचा अंदाजे ४७ टक्के पुरवठा होतो, त्यामुळे हा निर्णय भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरला होता.
ट्रम्प यांचा भूमिका बदल
यापूर्वी ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के आणि रशियन तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त २५ टक्के परस्पर शुल्क लादले आहे. त्यांनी सातत्याने असा दावा केला होता की त्यांनी लादलेल्या मोठ्या आयात शुल्कामुळे महागाई वाढत नाही.